शनिवार, १० डिसेंबर, २०११

असे वाटते

(छायाचित्र सौजन्य: नम्रता )
.
.
तू माझ्या आयुष्यात आलीस
सौंदर्याची लाट होऊन
तू माझी प्रेरणा झालीस
सोनेरी पहाट होऊन

तुझा सावळा रंग झाला
माझा आवडता रंग
तुला भेटणे सहजच झाला
गोड अविस्मरणीय प्रसंग

तू सांगितलेस सर्व तुझे
काही सुखं काही वेदना
तू कधीच आणला नाहीस
आनंदाचा आव उसना

तू नितळ पाण्यासारखी
नेहमी समोर येत गेलीस
तुझ्या खरेपणामुळेच तू
माझी सखी होत गेलीस

काठोकाठ डोळा भरून
तू हसतेस म्हणूनच पण
असे वाटते तुझ्यावरून
ओवाळावा प्रत्येक क्षण

तुषार जोशी, नागपूर

.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा