सोमवार, ३० एप्रिल, २०१२

उत्सव

(छायाचित्र सौजन्य: वृंदा )
.
.
मला किनई एकदा तुला
माझ्याशीच फोनवर बोलताना पाहायचंय
'मला तू आत्ता पाहिजे'
हे जसं तू फोनवर म्हणतेस ना
ते कसं दिसतं ते टिपायचंय.

मी जेव्हा म्हणतो की
'तू सुगंधाची कुपी आहेस'
तेव्हा तू लाडिक हसतेस
काय दिसत असशिल गं तेव्हा!
ते दिसणं सुद्धा मला मनात साठवायचंय.

तासनतास माझ्याशी बोलताना
शुन्यात बघत असशील
वारा तुझ्या केसांशी खेळत असेल
देहभान विसरत असशील
ते चित्र एकदातरी हृदयामधे जपायचंय

मी तुला आज
तू दिसशील त्या अंतरावरून
करणार आहे फोन, आणि
तुला बोलताना बघण्याचा
मंत्रमुग्ध उत्सव साजरा करणाराय.

तुषार जोशी, नागपूर
+९१ ९८२२२ २०३६५
३० एप्रिल २०१२, ०८:००
.
.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा