सोमवार, २१ सप्टेंबर, २०१५

तू मला मी तुला

(छायाचित्र सौजन्य: दीप्ती
.
.
हास्य ओठांतुनी सांडते केवढे
का गं डोळ्यांमधे दाटलेले झरे?
हास्य वाटे जसे मोहरे केवडा
खोल डोळ्यांमधे खिन्नता का उरे?

साचल्याने कसे व्हायचे सांग तू
वाहुदे शल्य ठेऊ नको बांधुनी
हासणे ना खरे फक्त ओठांवरी
हासणे येऊदे थेट डोळ्यांतुनी

दे तुझे शल्य सारे मला होऊदे
दीप वाटेवरी तू मला मी तुला
वेल झाडास का भार होते कधी?
रोम रोमातुनी हास माझ्या फुला

तुष्की नागपुरी
२१ सप्टेंबर २०१५, १८:३०

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा