रविवार, २ ऑक्टोबर, २०११

तुला कोणी सांगितलेय का गं?

(छायाचित्र सौजन्य: मयुरी)
.
.
तुझ्याबद्दल बोलायचे झाले तर

माझे शब्द वेड्यासारखे वागतात
तुला कोणी सांगितलेय का गं?

तुला बघुन अप्सरा पण लाजतात.

श्वास थांबतो हृदयाचा ठोका चुकतो

मनामध्ये मोर थुई थुई नाचतात
तुला कोणी सांगितलेय का गं?

मेघ तुला बघायलाच दाटतात.

तुला कितीदा पण पहिले तरी
ते क्षण नेहमी कमीच वाटतात

तुला कोणी सांगितलेय का गं?

तू नसतानाचे क्षण किती जाचतात

तुझा विचारही मनात येतो जेव्हा
मनात अत्तराची तळी साठतात
तुला कोणी सांगितलेय का गं?

तू येताच चोहिकडे सतारी वाजतात

तू हसतेस, डोळ्यांचे पारणे फिटते

चैतन्याचे वारे वाहू लागतात

तुला कोणी सांगितलेय का गं?
लोक प्रार्थनेत तुझे दिसणे मागतात

तुषार जोशी, नागपूर
.
.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा