मंगळवार, ४ ऑक्टोबर, २०११

काही चेहेरे

(छायाचित्र सौजन्य: गिरिष)
.
.
काही चेहरे स्नेहाचा संदेश सांगतात
काही चेहरे प्रगल्भतेचे कोष वाटतात
लक्षात राहतात भेटल्यावरती काही चेहरे
काही चेहरे पाहताक्षणीच छाप पाडतात

काही चेहरे दिसले की मन शांत राहते
काही चेहरे हसतील तेव्हा सुख दाटते
हवेच असतात जवळ नेहमी काही चेहरे
काही चेहरे बोलतात तेव्हा धन्य वाटते

काही चेहरे प्रामाणिक प्रशस्त वाटती
काही चेहरे सत्याची देतात पावती
सभोवताली व्यापुन उरती काही चेहरे
काही चेहरे तर डोळ्यांनीच शिस्त लावती

भाग्यवान तो असा चेहरा ज्यास मिळाला
मित्रा तुझा चेहरा म्हणजे एक त्यातला

तुषार जोशी, नागपूर
.
.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा