बुधवार, ४ जून, २०१४

योग

(छायाचित्र सौजन्य: नेहा )
.
.
ऐकताना मुग्ध व्हावी धन्य व्हावी स्पंदने
पाहताना अन् फिटावे डोळियांचे पारणे
छेडता तू तार हरते देह आणिक भान ही
अटळ आता नादवेडे चित्त माझे गुंतणे
.
चेहरा आरक्त हाती शोभते गीतार ती
साधती संगीत दोन्ही हात तन्मय नादती
केस करती नृत्य वाऱ्यावर मनावर राज्य ही
वेड लावी ही अदा धडधड जलद व्हावी किती
.
कोरसी हृदयात झंकारून तारा गीत तू
ऐकता अमृत स्वरांचे बदलतो माझा ऋतू
श्वास धरतो ताल आणिक वेदना होते तरल
नादमय हा जन्म होतो मानसी उरतेस तू
.
गोड हा संभ्रम किती मी ऐकू की पाहू जरा
ना घडे हा योग नेहमी दुग्ध आणिक शर्करा
.
~ तुष्की
नागपूर, ०४ जून २०१४, २०:३०

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा