गुरुवार, १२ जून, २०१४

तुझ्यात काहीतरी आहे..

(छायाचित्र सौजन्य: यामिनी )
.
.
तुझ्यात काहीतरी आहे
जे सांगताच येत नाही
पण हृदयाची धडधड माझी
सर्वांना ऐकू येई
.
तुझ्यात काहीतरी आहे
डोळ्यात खोल दडलेले
कितीतरी स्वप्नांचे पक्षी
उडण्यासाठी अडलेले
.
तुझ्यात काहीतरी आहे
जे माझे गणित चुकवते
आधीचे सुंदर दिसण्याचे
सगळे ठोकताळे हुकवते
.
तुझ्यात काहीतरी आहे
ज्यामुळे मीच बदलतोय
तुझ्या नजरेत येण्यासाठी
माझा अणू रेणू उसळतोय
.
तुझ्यात काहीतरी आहे
जे फक्त बघत रहावं
या जग विसरण्याच्या
अनुभूतीतच जगणं व्हावं
.
तुझ्यात काहीतरी आहे
जे कुणाजवळच नाही
सावळ्या रंगाच्या जादूने
जणू नटलेली काया ही
.
तुझ्यात काहीतरी आहे
जीव ओवाळावा असं
कृष्णाच्या बसरीने गोकूळ
मुग्ध व्हायचे अगदी तसं
.
तुझ्यात काहीतरी आहे
जे दिशांना प्रभावित करतं
किती क्षणांच्या सोहळ्याचं
मोहरण्याचं कारण ठरतं
.
~ तुष्की,
नागपूर, १२ जून २०१४, २३:००

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा